।।क्षरला सागर गंगा ओघी मिळे ।।



जय हरी !
क्षरला सागर गंगा ओघी मिळे । आपणचि खेळे आपणासी ।।
मधील ते वाव अवघी उपाधी । तुम्हा आम्हामधी तेचि परी ।।........ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी या अभंगाद्वारे विश्वातील चिरंतन सत्य सांगितले. सागराच्या मनात एक खेळ खेळावा वाटले आणि त्याने आपले स्थान सोडले व वाफेच्या रूपाने तो आकाशात गेला आणि तिथे ढग बनून विहार करू लागला त्याला पुढे गेल्यावर थंड वारे लागले आणि सागर ढगातून पाऊस होऊन बरसू लागला . तो हिमालयात , सह्याद्रीत व विविध डोंगरावर बरसला आणि त्या पर्वतावरून नदीच्या रूपाने उताराच्या दिशेने खळ खळ आवाज करीत धावू लागला काही ठिकाणी तो धबधबच्या रूपाने भयंकर रूप घेऊन धावू लागला... आम्ही त्याला नावे दिली ," गंगा मैया , यमुना मैया, नर्मदा मैया .... गोदावरी माता . " अशा नद्यांच्या रूपाने हाच सागर या पृथ्वीवरून सर्वत्र सुजलाम सुफलाम करीत जाऊ लागला .  त्याच्या तीरावर तीर्थक्षेत्रे निर्माण झाली आणि लोक पापक्षालनासाठी त्यात स्नान करू लागले. " पोखीत तिरींचे पादप । समुद्री जय आप गंगेचे जैसे ।।" खारट सागर पण गंगा यमुनेच्या रूपाने "गोड " झाला आणि लोकांना सुसेव्य झाला . आणि विशेष म्हणजे त्यामध्ये इतक्या नद्यांचे पाणी येते तरी तो वाढत नाही आणि इतकी वाफ होते तरी तो कमी होत नाही कारण हा त्याचाच खेळ आहे, म्हणून तो मर्यादा सुद्धा ओलांडीत नाही पण कधी कधी तो त्सुनामीच्या रूपाने उग्र रूप सुद्धा दाखवतो . त्याच्या पोटात चौदा रत्ने देवादिकांना मिळालेत म्हणून त्याला रत्नाकर म्हणतात. जर सागर नसता तर पृथ्वीवरील जीवन राहिले नसते. असा हा सर्व सागराचा खेळ आहे . आणि हाच विषय जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना सागराच्या किनाऱ्यावर सुचला असावा . हि संतांची दृष्टी आहे. आपण किती वेळा समुद्र किनारी जातो पण आपल्याला हे सुचत नाही . त्याला ती दृष्टी असावी लागते. या अभंगाद्वारे महाराजांनी वेदातील एक सिद्धांत सांगितला  तो म्हणजे जीव आणि शिव या उपाधी आहेत तेवढी उपाधी जर गेली तर एकच ब्रहम आहे आणि ते व्यापक असून हे विश्व म्हणजे त्याचाच विस्तार आहे किंबहुना हा त्याचा खेळ आहे. गंगा यमुना हि नावे जर सोडली तर तो फक्त सागरच आहे दुसरे काहीही नाही. मुकुंदराज स्वामी परमामृतमध्ये म्हणतात " नदी उगम स्थिरावे । तरी सिंधूपण का न पावे । तैसे जीवाचे ब्रहम का न व्हावे । या स्थिती राहता ।।" नदीचा खरा उगम सागरात आहे डोंगरात नाही .... समुद्राची वाफ झाली नसती तर नदीचा उगमच झाला नसता .
      इतका सुंदर विचार  मला कर्नाटकातील उडुपी या शहरापासून जवळच असलेले " सेंट मेरी आयलंड " या समुद्रातील बेटावर आम्ही फिरायला गेलो तेव्हा तेथील सौदंर्य पाहून स्फुरला ...... आमचे जेष्ठ चिरंजीव योगेश आणि आमची स्नुषा रागिणी यांनी हे सर्व नियोजन केले होते.बरोबर आमची नात अनघा होती . व आम्ही उभयता होतो . योगेशच्या आग्रहानेच  आम्ही कर्नाटक मोहीम आखली आणि यशस्वी झाली उडुपी या शहरापासून जवळच मालपे हे छोटेशे गाव आहे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हे आहे . येथे समुद्रात चार बेटे आहेत. त्यांना कोकोनट आयलंड सुद्धा म्हणत पण अशी आख्यायिका आहे कि वास्को दि गामा हा १४९८ साली पोर्तुगालपासून केरळकडे जात असताना तो या बेटावर थांबला आणि या बेटांना त्याने मदर मेरीचे नाव दिले " सेंट मेरीज आयलंड " हे बेट अतिशय सुंदर आहे नितळ पाणी आणि छान असा बीच आहे . येथील वैशिष्ठ म्हणजे येथे किनाऱ्यावर वाळू नसून सर्वत्र शिंपले आहेत. लोक सुट्टीचे येथे येतात व पोहण्याचा आनंद घेतात. विशेष करून तरुण मंडळी भरपूर असतात. मालपेपासून फेरी बोट असते . त्या बोटीमध्ये  डी जे असतो त्यात विविध गाणे लावतात. .... बरेचसे गाणे  कानडीमध्ये  असतात पण ! गंमत म्हणजे मराठीतील सैराटमधील " झिंग झिंग .... गाण्याने तेथील कानडी लोकांना सुद्धा थिरकायला भाग पाडते . मराठीचा येथे सुद्धा डंका वाजला. समुद्राचे व्यापकपण आपल्याही मनाला व्यापक बनवते.
       कर्नाटक सरकारने पर्यटनला खूप प्रोत्साहन दिले आहे. व व्यवस्था सुद्धा उत्तम केलेली आहे. समुद्र किनारा स्वच्छ ठेवला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद .

भगवंताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
टीप :- मित्रांनो कर्नाटक मोहिमेचे प्रवास वर्णन क्रमश: सादर करिन .. ब्लॉगची लिंक
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकू http://karnataku.blogspot.in/


 



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा